Wednesday, October 5, 2011

हॅलो. अखेर एकदा मी ब्लॉग लिहायला सुरवात केली. खरं तर कितीतरी मित्रमैत्रिणींच्या विशेषकरुन अनिल, कांचन, उल्का आणि माझी लेक यांच्या प्रोत्साहनानं मी पुन्हा लेखणीला हात घालायचं मनावर घेतलंय.. पाहू या. कसं किती जमतं ते. यावेळी मला आठवण येतेय ती माझ्या स्वर्गवासी आईची. ती काही वर्षांपूर्वी मला एकदा म्हणाली होती, "आता पुन्हा तुझं लिखाण हळूह्ळू सुरू कर. म्हणजे तुला एक चांगला विरंगुळा होईल. ही तुझी कला, ही देणगी अशी विसरून जाऊ नकोस". शाळेतल्या ओक बाई एकदा अचानक रस्त्यात भेटल्या. त्यांचंही हेच म्हणणं. खूप मागे एकदा दादरला अशाच लिमये बाई अचानक भेटल्या तर त्यांनीही हीच चौकशी केली. तेव्हा कधीपसून मनात असेल माझ्या की लिहावं आता, पण मुहूर्त कुठे लागत होता!

खरं सांगू का, कधीकधी भल्या सकाळी घाईघाईनं घरकाम उरकताना बाहेरुन बुलबुलांचे गोड गाणे कानावर पडते. चिमण्यांची चिवचिव ऐकू येत असते. कधी दुपारी बागेतल्या झाडांवर खारींचे मोहक बागडणे आणि त्याहूनही मोहक त्यांचे बडबडणे खुणवत असते. आणि अशा वेळी मनात खूप काहीतरी उभारुन यायला लागते. खूप काही सुचत असतं, पण कागदावर उतरवायला फुरसद नसते. खूप अवेळा धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीत स्वत:चा तोल सांभाळताना आजूबाजूला चाललेल्या गोंधळातून (गर्दी, आवाज, धक्के इ.इ. ) अलिप्त, निर्मम होत जाते. आणि त्यावेळी असंच मनात खूप काही टपटपायला लागतं प्राजक्ताच्या फुलांसारखं.. वाटतं, या क्षणी लिहीता आलं तर? मग दिवसभर ऑफिसच्या झटापटीत आणि घरी गेल्यावर घरच्या व्यापात ती सगली फुलं कुठे कोमेजून जातात कोण जाणे!
असो. तर खूप खूप काही सांगावसं वाटतं. दूरदूर असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना भेटावसं वाटतं. या अफाट शहरातल्या कोंदून टाकणार्‍या वातावरणात कधीकधी खूप एकाकी होतात माणसं. मीही अपवाद नाही त्याला. त्यावेळी मनात वळीव बरसतो तो जुन्या दिवसांच्या सुखद आठवणींचा. मग मनात येणार्‍या अनेकानेक गोष्टी शेअर कराव्या वाटतात. म्हणून हा ब्लॉगचा प्रपंच. आता माझ्या मनाच्या आरशातून थेट तुमच्या मनात कवडसे पाडत राहीन.


सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment