Monday, December 10, 2012
मेकओव्हर
मेकओव्हर
ते उन्हाळ्याचे दिवस होते. चकचकीत उन्हानं आसमंत नाहून निघत असलेला. लोकल ट्रेनचा प्रवास अशावेळी तर नकोसा होतो. मग कसातरी कासावीस जीव संभाळत एकदाचं धक्क्याला केव्हा लागतोय याची वाट पहायची.. अशाच एका दिवशी गाडीतल्या तिनं माझं लक्ष वेधून घेतलं. हो, तीच होती ती. पांढरट रंगाच्या हलक्याफुलक्या साडीवर शेवाळी, निळसर रंगाचं मोठंमोठं डिझाईन अंगभर पसरलेलं.. आणि त्यातल्याच शेवाळी रंगाचा नाजूक पांढर्या फुलांचं डिझाईन असलेला ब्लाउज. न रहावून मी तिच्या साडीचं कौतुक केलं. या अशा उन्हाळ्यात नजरेला ती साडी खूप आल्हाद देऊन जात होती. तिच्या साडीचं कौतुक ऐकून ती खुलली. हसली.. मला माहीत होतं की साडया, कपडे, दागिने याबद्दल बोलण्यात चर्चा करण्यात तिला खूप रुची आहे. संध्याकाळच्या गाडीत अनेकदा मी तिला मैत्रिणींबरोबर या प्रकारच्या, नव्हे, याच प्रकारच्या चर्चा करताना ऐकलं होतं (आणि मी बोअर झाले होते). मी तिच्याकडे पाहिलं. टिपिकल पंजाबी/ सिंधी चेहरा. गोरीपान, गुलाबी छटा असलेली पण जुन्या मुरमांच्या खुणा मिरवणारी त्वचा, जरा जाडसर पसरट ओठ, अरुंद कपाळ, जरासे पुढे आलेले दात आणि बाकदार नाक. बारीक अंगकाठी, मोकळे सोडलेले ओलसर केस.. ती हसत होती. खूष होऊन.
मला आठवलं. काही वर्षांपूर्वी ही स्त्री सकाळच्या गाडीतल्या गर्दीतच माझ्याशी अचानक बोलू लागली. आणि बोलता बोलता रडू लागली. संपूर्णत: अनोळखी स्त्री.. केवळ गाडीत दिसणारी, एवढीच तिची माझी पहचान. तिचा नवरा तिच्याशी नीट बोलत नाही, काही केलं तरी खेकसतो, रागावतो, सासूही तशीच, काय करावं कळत नाही असं म्हणून पुन्हा हमसूनहमसून रडू लगली ती. आपल्या नशीबाला, आयुष्याला दोष देऊ लगली. निष्फळ ठरवू लागली.. समजुतीचे काही चार शब्द बोलून मी तिचं रडं थांबवायचा प्रयत्न केला खरा, पण पुढे अनेक दिवस तिची अवस्था काही बदलली नसावी. खूप दिवस मी तिचा रडवेला, दुर्मुखलेला, उदाससा चेहराच पहात आले होते. मनात मी म्हणत असे, काय तरी या बाईचं चाललंय? इतका कसला त्रास होत असेल तिला? बिचारी. नवरा, सासू खूप त्रास देत असतील का? तशी ती खूप साधी रहाणारी, खरंतर जरा गबाळीच दिसे. रूपही यथातथाच, त्यामुळेही तिचा नवरा तिला टाकून बोलत असेल असंच काहीसं मला तिच्या बोलण्यातून जाणवलं होतं. मला उगाच काळजी वाटे. पण मग कशाला असे लोक अशा साध्या बापडया मुलींशी करतात लग्न? का नाहीत करत एखाद्या चतुर चटपटीत नवअप्सरेशी? हो, पण तशी टिपटॉप अप्सरा मिळायला त्यांचीही लायकी, ऐपत कुठे असते? पण हे ते विसरून जातात सोयीस्करपणे. आणि जरा नीट कमावते, स्थिर झाले की सुरवातीला परी वाटलेली हीच बायको नंतर टाकाऊ वाटू लागते त्यांना. मला तिची कणव येई, पण रागही येत असे. चांगली नोकरी दिसतेय, फर्स्टक्लासने प्रवास करतेय. असल्या नवर्याणला हिनेच खरंतर झटकून टाकायला हवं तिच्याशी असं वागत असेल तर. खूप वर्षं तिला असंच पहात आले होते मी.
दरम्यानच्या काळात माझी रोजची गाडी बदलली होती. तीच काय, पण नेहमीच्या ट्रेन-फ्रेंड्सही भेटेनाशा झाल्या. आणि एका हिवाळ्यातल्या आल्हादक दुपारी मला ती नव्यानेच उगवून आलेल्या एका प्रसिध्द मॉलमध्ये सहकुटुंब शिरताना दिसली. मी तिला पाहून अभावितपणे थांबले. आणि पहातच राहिले. पुढे चालत होता तो तिचा नवरा असावा. मधे दहा-बारा वर्षाचे दोन मुलगे. मागे ही. हिचे केस मानेबरोबर कापलेले, आणि जीन्स व लॉंग टी शर्ट घातलेला. (तो फॅशनच्या हिशेबात जरा अतीच लांब वाटत होता). कपाळावरची ती चमक लावलेली टिकली आणि भांगातला लालभडक सिंदूर ही मंडळी मात्र आपल्या जागी तशीच आणि त्याच साईजमध्ये हक्काने विराजमान होतीच होती. तिच्या चेहर्यााच्या ठेवणीला आणि एकूण व्यक्तिमत्वाला हे कपडे, ही हेअरस्टाईल अगदीच विचित्र दिसत होती खरी, पण ती हसली माझ्याकडे पाहून, अगदी दिलखुलास हसली आणि मला कळलं की ती खूप खूष आहे. स्वत:वर खूप खूष आहे, कारण तिच्या या मेकओव्हरनं तिचा नवरा खूष असावा..
अशी ती. पुढे संध्याकाळच्या एका गाडीत अधूनमधून दिसू लागली. पूर्वीचा तिचा उदास, दुर्मुखलेला रडवेला चेहरा आता नाही. ती मजेत असते, गप्पा मारत असते नव्या नव्या मैत्रिणींबरोबर. आता वाढलेल्या वयानंही तिच्यात एक प्रकारचा समंजसपणा आलेला दिसतोय. कदाचित सासूचं वय झाल्यानं हिच्या हाती घराचे अधिकार आलेले असतील, किंवा नवरोजीला ऑफ लेट का होईना बायकोची खरी किंमत कळू लागली असेल, कारण काहीही असो, बाईसाहेब फुल मजेत असतात हे खरं. मला बरं वाटतं तिचा हसरा आनंदी चेहरा पाहताना. आता जवळजवळ रोजच असते ती माझ्या संध्याकाळच्या गाडीला. सतत साड्या, ड्रेस, बांगड्यांच्या चर्चेत असते बुडालेली. पण खूष असते.. चला, खूष तर असते..!
*************************************************************
Thursday, March 29, 2012
वसंतवैभव-बहावा
पृथ्वीवर वसंताचं आगमन झालंय हे कुणी सांगाया नको.आपण गुढी उभारुन आणि तोरण-रांगोळ्यांनी त्याचं स्वागत केलं आहेच.आता त्याचे नयनमनोहर सोहळे पहायला मिळू लागलेत.वसंतागम..वसंताची चाहूलच मला मुळी लागते ती बहाव्याच्या फुलू लागलेल्या झाडांकडून.रोज सकाळी ट्रेनमधून जाताना विक्रोळीला गोदरेज कंपनीत असलेल्या बहाव्याकडे मी लक्ष ठेवूनच असते.जवळजवळ निष्पर्ण झालेल्या झाडांवर काळसर शेंगा लट्कताना दिसत असतात आणि अचानक एके दिवशी पिवळेधम्म फुलांचे लोंबणारे घोस दिसू लागतात. मार्चच्या मध्याला हा बहर उमटू लागतो आणि एप्रिलमध्ये तो आसासून फुलतो,सोन्याच्या झळाळीने आसमंत उजळून टाकतो.एकेक झाड अटीतटीनं अगदी आतआतून उमलून फुलून बहरून येतं.पिवळ्याकेशरी चैत्रीय उन्हात झळाळत्या सोनेरी रंगानं तेजाळणारं एकेक अख्खं झाड पहाताना डोळ्याचं पारणं फिटतं. जसजसा जून महिना येऊ लागतो,तसतसा समजूतदारपणे बहावा आपला सुवर्णवर्षाव आवरता घेताना दिसतो,जेव्हा पावसाळी मळभाची चाहूल लागते,तेव्हा हे महाराजा हिरव्या पानांची झूल पांघरून घेतात,ती थंडीपर्यंत उतरवत नाहीत.पण पॉंडिचेरीला मात्र आश्रमाजवळच्या रस्त्यावर भर ऑगस्ट महिन्यात मी पूर्ण डंवरलेला बहावा पाहिला आणि पाय जमिनीला खिळलेच.
पण यावर्षी काय झालंय या बहाव्याला? मार्च संपत आला तरी एकही झाड उमलू लागलेलं नाही.गेल्या वर्षी जरा लौकरच बहरली आणि लौकरच मावळली होती ती सुवर्ण-संपदा.यावर्षी थंडी बरीच लांबली आणि कडकही होती.पण आता तर ऊन चांगलंच तापू लागलंय. मुंबईकरांचे सालाना येणारे सुखाचे दिवस संपलेत.छान छान साड्या पुन्हा कपाटात जाऊन बसल्यात.मुंबईकर सज्ज झालाय उन्हाळा आणि मग पावसाळ्यासाठी.असो.माझा आवडता बहावा..अमलताश असंही म्हणतात त्याला.आणि जास्त प्रसिध्द नाव म्हणजे लॅबर्नम.गावदेवीला चक्क लॅबर्नम रोडच आहे.(आणि पार्ल्याला गुलमोहर रोड,तशी पुण्याला कांचन गल्ली).कारे बाबा अमलताशा,अजुनी रुसुनी आहेस? मी पहातेय वाट,तुझ्या फुलण्याची,कारण त्याच्याशी माझे भावबंध जुळले आहेत.अजून ती सुवर्णकळा का दिसत नाहीये? परवा पुण्याला जाताना एक्स्प्रेस वे वर पाहिलं दोन्हीकडे अधूनँधून बहावा फुलू लागलाय.पुण्यातही तसा तुरळक दिसला.आजकाल एक्स्प्रेस वे च्या बाजूना वेगळीच सोनेरी पिवळ्याधोप रंगाच्या फुलांची झाडं दिसताहेत.पानंदिसतंच नाहीत.खालून वर निमुळती होत गेलेली.जणू पिवळ्या फुलांचा अख्खा बूकेच ठेवलेला आहे मांडून. असंच एक झाड मला रेल्वेलाईनच्या बाजूला मुलुंडजवळ दिसतं.झोपड्यांच्या गर्दीत काय उठून दिसतं ते.लखलखत असतं.नजरबंदी करतं ते.सोनमोहोर,बहावा ही तशी मोठी झाडं.त्या मानाने ते छोटंच.पण लई देखणं.
पण बहाव्याशी माझ्या मनाचं नातं आहे.माझ्या अगदी लहानपणी मी त्याला प्रथम पाहिला तो माळीनगरच्या गेस्टहाउसच्या आवारात.आणि बस.तेव्हापासून माझ्या मनातच फुलून राहिला तो.सृष्टीच्या चैतन्याचं एवढं सुंदर रुपखनी प्रतीक,एवढा उत्कट आविष्कार.जीव ओतून फुलणं म्हणजे काय,ते इतर झाडांनी बहाव्याला विचारावं.
आणि बहाव्याची एक गडद आठवण,हृदयाच्या कुपीत जपलेली.पण दरवर्षी ती बाहेर डोकावतेच.नव्हे,ती आठवण आणि बहावा एकात एक गुंतलेले आहेत.मी आणि माझी प्रिय मैत्रीण दीप्ती अकरावीच्या सुट्टीत संध्याकाळी फिरायला जात असू.चैत्राचे ते दिवस.सारीकडेच बहर.त्यावेळी पुणं खूप गोजिरं,मनोहर होतं.शांत रस्ते,छोटी छोटी बंगलीवजा घरं,सुरेख संवर्धिलेल्या बागा,ऊनसावल्यांचे खेळ,शीतल वारे आणि वसंत बहराचे सुगंध.अशा वेळी लॅबर्नमचं बहरलेलं झाड दिसलं की खिळलेच आमचे पाय आणि नजर.वेड्यासारख्या कितीतरी वेळ पहात उभ्या रहात असू आम्ही दोघी.मग एकमेकींना समाधीतून जागं करून पुढे जायचे.खरं म्हणायचं तर बहाव्याची झाडं शोधतच आम्ही फिरायचो.त्या संध्यासमयीच्या आठवणी अगदी सार्या रंगग़ंधांसहित दाटून येतात मनात.गळा भरून येतो,कारण ती माझी प्रिय सहेली नाही आता.ऐन चैत्रातच- बहाव,जॅकरेंडा,गुलमोहर,कॅशिया अशी आम्हा दोघींचे मनमीत भरभरून फुलण्याच्या बेतात असताना ती हे जग सोडून गेली.ती असताना चैत्रात बहावा-बहार पहाताना मला ते ऐन सोळाव्यातले जादूई दिवस आठवायचेच,पण ती गेल्यावर,आता तो बहार पाहिल्याशिवाय तर रहावत नाही आणि पहावतही नाही.कासाविशी होते पहाताना.ते सारं वसंत-वैभव कुठेना कुठे आहे,पण दीप्ती कुठे आहे!मी बडबडी,ती अबोल,शांत.माझी बडबड थांबवायला ती मला वेगळंच काहीतरी दाखवायची.एखादा खंड्या वगैरे.कधी एखादा गहन प्रश्न विचारून मला जरा वेळ गोंधळात टाकायची.आणि मग थोड्या वेळानं हसून,चल,जाऊदे,मला तरी कुठे माहीतेय,असं म्हणून माझी सोडवणूक करायची.कधी बी.एम.सी.च्या ग्राउंडच्या कट्ट्यावर आम्ही दोघी उंच झाडांचे शेंडे आणि आभाळात विहरणारे पक्षी पहात बसायचो.बकुळीची फुलं तिला खूप आवडत.ती त्यांना किती सोनुली आहेत वगैरे म्हणायची.रस्त्यात टपटपलेली बकुळफुलं वेचताना त्या वेड्या वयात काही वाटायचं नाही.कधीतरी भावुक होत मला असा बकुळीचा जन्म मिळायला हवा होता असंही म्हणून गेली होती.मला ती बर्याचदा 'ए परे' अशी हाक मारत असे.(म्हणजे स्वत:चंही आड्नाव परांजपे असंच असूनही.वर मला तुला अशी हाक मारायलाच जास्त बरं वाटतं असंही म्हणत असे.)कधीकधी ती मला अतीव प्रेमानं काय ग कविते,असंच चक्क म्हणालेली!गेली ती.खूप खूप चांगलं काम करता करता गेली.माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी स्वत:चीवैयक्तिक सुखदु:ख बाजूला ठेवून काम करणारी कर्मयोगिनी दीप्तीनं जाण्यासाठीही जागतिक महिला दिनाचा दिवस निवडावा? तीन वर्ष झाली,पण तिच्या नसण्याची जाणीव उणीव सर्वच मैत्रिणींना सतत होत राहीलीय.हे बहावा भरभरून फुलण्याचे दिवस,तेच तिच्या मनभरून आठवणींचे. न मिटणारया त्या आठवणींखातर हा बहाव्याचा लेख दीप्तीला समर्पित.
-स्वाती.

Subscribe to:
Posts (Atom)