Monday, December 10, 2012
मेकओव्हर
मेकओव्हर
ते उन्हाळ्याचे दिवस होते. चकचकीत उन्हानं आसमंत नाहून निघत असलेला. लोकल ट्रेनचा प्रवास अशावेळी तर नकोसा होतो. मग कसातरी कासावीस जीव संभाळत एकदाचं धक्क्याला केव्हा लागतोय याची वाट पहायची.. अशाच एका दिवशी गाडीतल्या तिनं माझं लक्ष वेधून घेतलं. हो, तीच होती ती. पांढरट रंगाच्या हलक्याफुलक्या साडीवर शेवाळी, निळसर रंगाचं मोठंमोठं डिझाईन अंगभर पसरलेलं.. आणि त्यातल्याच शेवाळी रंगाचा नाजूक पांढर्या फुलांचं डिझाईन असलेला ब्लाउज. न रहावून मी तिच्या साडीचं कौतुक केलं. या अशा उन्हाळ्यात नजरेला ती साडी खूप आल्हाद देऊन जात होती. तिच्या साडीचं कौतुक ऐकून ती खुलली. हसली.. मला माहीत होतं की साडया, कपडे, दागिने याबद्दल बोलण्यात चर्चा करण्यात तिला खूप रुची आहे. संध्याकाळच्या गाडीत अनेकदा मी तिला मैत्रिणींबरोबर या प्रकारच्या, नव्हे, याच प्रकारच्या चर्चा करताना ऐकलं होतं (आणि मी बोअर झाले होते). मी तिच्याकडे पाहिलं. टिपिकल पंजाबी/ सिंधी चेहरा. गोरीपान, गुलाबी छटा असलेली पण जुन्या मुरमांच्या खुणा मिरवणारी त्वचा, जरा जाडसर पसरट ओठ, अरुंद कपाळ, जरासे पुढे आलेले दात आणि बाकदार नाक. बारीक अंगकाठी, मोकळे सोडलेले ओलसर केस.. ती हसत होती. खूष होऊन.
मला आठवलं. काही वर्षांपूर्वी ही स्त्री सकाळच्या गाडीतल्या गर्दीतच माझ्याशी अचानक बोलू लागली. आणि बोलता बोलता रडू लागली. संपूर्णत: अनोळखी स्त्री.. केवळ गाडीत दिसणारी, एवढीच तिची माझी पहचान. तिचा नवरा तिच्याशी नीट बोलत नाही, काही केलं तरी खेकसतो, रागावतो, सासूही तशीच, काय करावं कळत नाही असं म्हणून पुन्हा हमसूनहमसून रडू लगली ती. आपल्या नशीबाला, आयुष्याला दोष देऊ लगली. निष्फळ ठरवू लागली.. समजुतीचे काही चार शब्द बोलून मी तिचं रडं थांबवायचा प्रयत्न केला खरा, पण पुढे अनेक दिवस तिची अवस्था काही बदलली नसावी. खूप दिवस मी तिचा रडवेला, दुर्मुखलेला, उदाससा चेहराच पहात आले होते. मनात मी म्हणत असे, काय तरी या बाईचं चाललंय? इतका कसला त्रास होत असेल तिला? बिचारी. नवरा, सासू खूप त्रास देत असतील का? तशी ती खूप साधी रहाणारी, खरंतर जरा गबाळीच दिसे. रूपही यथातथाच, त्यामुळेही तिचा नवरा तिला टाकून बोलत असेल असंच काहीसं मला तिच्या बोलण्यातून जाणवलं होतं. मला उगाच काळजी वाटे. पण मग कशाला असे लोक अशा साध्या बापडया मुलींशी करतात लग्न? का नाहीत करत एखाद्या चतुर चटपटीत नवअप्सरेशी? हो, पण तशी टिपटॉप अप्सरा मिळायला त्यांचीही लायकी, ऐपत कुठे असते? पण हे ते विसरून जातात सोयीस्करपणे. आणि जरा नीट कमावते, स्थिर झाले की सुरवातीला परी वाटलेली हीच बायको नंतर टाकाऊ वाटू लागते त्यांना. मला तिची कणव येई, पण रागही येत असे. चांगली नोकरी दिसतेय, फर्स्टक्लासने प्रवास करतेय. असल्या नवर्याणला हिनेच खरंतर झटकून टाकायला हवं तिच्याशी असं वागत असेल तर. खूप वर्षं तिला असंच पहात आले होते मी.
दरम्यानच्या काळात माझी रोजची गाडी बदलली होती. तीच काय, पण नेहमीच्या ट्रेन-फ्रेंड्सही भेटेनाशा झाल्या. आणि एका हिवाळ्यातल्या आल्हादक दुपारी मला ती नव्यानेच उगवून आलेल्या एका प्रसिध्द मॉलमध्ये सहकुटुंब शिरताना दिसली. मी तिला पाहून अभावितपणे थांबले. आणि पहातच राहिले. पुढे चालत होता तो तिचा नवरा असावा. मधे दहा-बारा वर्षाचे दोन मुलगे. मागे ही. हिचे केस मानेबरोबर कापलेले, आणि जीन्स व लॉंग टी शर्ट घातलेला. (तो फॅशनच्या हिशेबात जरा अतीच लांब वाटत होता). कपाळावरची ती चमक लावलेली टिकली आणि भांगातला लालभडक सिंदूर ही मंडळी मात्र आपल्या जागी तशीच आणि त्याच साईजमध्ये हक्काने विराजमान होतीच होती. तिच्या चेहर्यााच्या ठेवणीला आणि एकूण व्यक्तिमत्वाला हे कपडे, ही हेअरस्टाईल अगदीच विचित्र दिसत होती खरी, पण ती हसली माझ्याकडे पाहून, अगदी दिलखुलास हसली आणि मला कळलं की ती खूप खूष आहे. स्वत:वर खूप खूष आहे, कारण तिच्या या मेकओव्हरनं तिचा नवरा खूष असावा..
अशी ती. पुढे संध्याकाळच्या एका गाडीत अधूनमधून दिसू लागली. पूर्वीचा तिचा उदास, दुर्मुखलेला रडवेला चेहरा आता नाही. ती मजेत असते, गप्पा मारत असते नव्या नव्या मैत्रिणींबरोबर. आता वाढलेल्या वयानंही तिच्यात एक प्रकारचा समंजसपणा आलेला दिसतोय. कदाचित सासूचं वय झाल्यानं हिच्या हाती घराचे अधिकार आलेले असतील, किंवा नवरोजीला ऑफ लेट का होईना बायकोची खरी किंमत कळू लागली असेल, कारण काहीही असो, बाईसाहेब फुल मजेत असतात हे खरं. मला बरं वाटतं तिचा हसरा आनंदी चेहरा पाहताना. आता जवळजवळ रोजच असते ती माझ्या संध्याकाळच्या गाडीला. सतत साड्या, ड्रेस, बांगड्यांच्या चर्चेत असते बुडालेली. पण खूष असते.. चला, खूष तर असते..!
*************************************************************
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment