Tuesday, May 6, 2014

ती


ती

ती सुरवातीला माणसाला दचकवते, भिवविते, दुखवते. हळुहळू माणूस  तिला सरावतो. त्याला त्यावाचून गत्यंतरच नसते. ती  कधीच त्याला आपलं म्हणायला नकार देत नाही. पण तिला त्याच्याकडून हवे असते एक अभिवचन, तिला आपली म्हणण्याचे. तिचे सर्व नखरे सहन करण्याचे. तिच्या मूडस वर नाचण्याचे. त्याने तिच्या अस्तित्वाची दखल न घेता आपल्याच मस्तीत जगावे असा प्रयत्न केला की ती त्याला झुगारून द्यायला मागेपुढे पहात नाही. असे महाभाग मग तिच्या नावाने बोटे मोडत आल्या पावली परत जातात. तिला त्याचे काही नसते. तिचा त्याला नाईलाज असतो. कारण रोज इतके महाभाग तिचा अनुनय करायला तिच्या दाराशी लोळण घेत असतात की ती कितीजणांना पारखत रहाणार? तिचे ठराविक ठोकताळे असतात. त्यात तुम्ही बसलात की दार उघडून आत यायला तुम्हाला कधीच ना नसते. आत आल्यानंतर त्या वातावरणाशी कसे सरावायचे, तिच्या सुरांशी आपले सूर कसे जुळवायचे याची चिंता तुम्ही करायची नाही. ते आपोआपच होते. त्या तिच्या महालात तुम्ही प्रवेश करता ते जरा बिचकतच. तो बहुरंगी, बहुढंगी माहौल तुम्हाला जागी खिळवून ठेवतो. पण तुम्ही असे खिळून राहू शकत नाही. तिचे उन्मादक रुप तुम्हाला पुढे पुढे जायला भुरळ पडत असते. तुम्ही यापूर्वी केवळ ज्या बड्या हस्तींची नावेच ऐकून आहात असे कितीतरी जण तेथे सहज वावरताना तुम्हाला दिसतात. त्यांच्या मांदियाळीत आपण कोण असा टिपिकल मध्यमवर्गीय,, भाऊ, मराठी काय हवे ते म्हणा, विचार तुमच्या मनात नाचू लागतो. तुम्हाला घाम फुटत असतो. पण एवढ्यात तुमचे लक्ष जाते अशा लोकांकडे, की जे अगदी तुमच्यासारखेच भाऊ टाईप असतात. त्यांच्याशी कुजबुजत तुमची विचारांची देवाण घेवाण चालू होते आणि मग तुम्हाला एक चिरंतन सत्य कळून चुकते, की अरे, आपण घाबरण्याचे काहीच कारण नाही, ही तर आपलीच आहे, प्रथमपासून. फक्त जरा नखरेल आणि दिलखेचक असल्याने इतरांचे लक्ष वेधून घेत ती आपल्यापासून कधी दूर दूर जाऊ लागली ते आपल्याला कळलेच नाहीये. हे ध्यानात आल्यावर तुम्ही जरा तिच्याशी सलगी दाखवू लागता. पण ती कसली खमंग-खट्याळ, ती तुम्हाला जरा दूरच रांगेत उभं करून ठेवते. तुम्ही खट्टू होता. पण मधेच ती तुमच्याकडे असे काही कटाक्ष टाकते, की त्यातून तुम्हाला वाटते की जणू ती असे सुचवीत आहे की अरे, तुझी माझी तर जुनी ओळख आहे. तुम्हाला हळुहळू तिच्या नखरेल अदांची, हट्टीपणाची, हुकुमत गाजवण्याची सवय होते. तिच्या तावडीतून सुटणे तुम्हालाच आवडत नसते. ती तुम्हाला सोडून द्यायला केव्हाही तयार असते. पण एखाद्या चेटकिणीसारखे तुमच्या मनावरचे तिचे गारुड दूर होता होत नाही. तिच्या लहरी, जराशा थयथयाटी स्वभावाला कंटाळून खूप जण निघून जातात, पण गेलेल्यातले कितीतरी पुन्हा तिच्या ओढीने परत फिरतात. तिच्या मोहजालात फसतात, तिचे पाईक होतात. तिच्या मनासारखे वागू लागतात. तिच्या तर्हांशी, लहरींशी कसे जमवून घेऊन तिला आपलेसे करायचे ते शिकतात, आणि मग तीच तुम्हाला फसते. अलगद तुमच्याही मनासारखे वागू लागते. तुमच्याही भावभावनांशी जुळवून घेते, त्यांचा आदर करते. तुमचाही खटयाळपणा सहन करते. तुमच्या जीवनाला आकार देऊ पहाते. तुम्हाला मग ती सर्वकाही देते, काहीही हातचे राखून न ठेवता. खरा तो तिचा स्वभावच नाही. पण तुम्ही तिच्या परीक्षेला उतरायला लागते हे मात्र खरे. ती तुम्हाला मोठे होण्याची रहस्यं दाखवते, मोठं व्हायला मदत करते, पण त्याबदल्यात काहीही मागत नाही. कोणी कधी मोठे होतात, कोणी नाही. पण तिला सर्व सारखेच असतात. तिच्या मनात शिरलात की मग ती तुमची केव्हा जिवलग सखी होते ते तुम्हालाच कळत नाही. तिचे जगणे तुमचे जगणे होते, तिचे गाणे तुमचे गाणे होते, तिचे सुख, तिचे दु:ख, तिच्या आकांक्षा तुमच्या असतात.  तिच्यावर होणारी टीका, तिच्यावर होणारे प्रहार तुमच्यावर होत असतात. तिच्याबरोबर तुम्ही ओरबाडले जाता, दुखवले जाता, धडपडता, पडता पण खचून न जाता पुन्हा उभे रहाता. तेही तिचेच सामर्थ्य असते. तुम्ही त्या सामर्थ्यानेही दिपून जाता, भयचकित होता आणि तिच्या आणखीनच प्रेमात पडता. तिची काळजी करता. तिच्या सुखाच्या खुणा तुमच्या चेहर्यावर दिसतात, तिच्या दु:खाचे ओरखाडे तुमच्या शरीरावर उमटतात. तुम्ही तिच्याबरोबर मोहरता, बहरता, शहारता. गहिवरता. हळुहळू तुमचे वय होत जाते. केस पांढुरके दिसू लागतात. शरीरात पहिली ताकद, मनात पूर्वीची उभारी रहात नाही. पण ती तशीच असते. सदाबहार, मोहरलेली, चहुअंगांनी फुलत असलेली. नवनव्या अनुभवांनी समृध्द होत राहिलेली. कधी ती तुम्हाला नवयौवनाच वाटते, कधी पुरंध्री. कधी रूपखनी, तर कधी त्रासलेली, गळपटलेली, मळलेली. जुनाट्लेली. अशा वेळी कधी कधी तिला त्यागून दूर जावे वाटतेही. पण त्या विचारांचे वाईटही वाटते. तरीही खूपजण दूर जातात. थकून, कंटाळून, उबगून. दूर शांत निवारा शोधतात. तिला त्याचे काही नसते. अलिप्त मनाने ती तुम्हाला निरोप देते. तुमचे डोळे पुसते. आणि आठवण आली तर पुन्हा ये जरुर, मी इथेच आहे, तुझ्यासाठी, असेही सांगते. ती त्यावेळी एखाद्याला तेजस्वी योध्या स्त्रीसारखी भासते. कधीही न हारणारी, कुणालाही हारू न देणारी. तर कुणाला सदासर्वकाळची अभिसारा, हातात फुलांची माला घेऊन डोळे जड्वून बसलेली. काही असो, ती तुमचीच असते.

ती मायानगरी मुंबई असते.

1 comment:

  1. Swati, khup sundar lihile aahes, mi pan Mumbainagarichi ek fan aahe.

    ReplyDelete