नवरात्रीचे दिवस आहेत. शेजारच्या सोसायटीत देवीची स्थापना करतात. मगाशी दांडियाचे आवाज ऐकू येत होते. आता ठिकठिकाणी दांडिया असतो. झगमग पोशाख, मेकप, खाद्यपेयांचे स्टाॅल्स, बक्षीसं आणि कायकाय! आजकाल आम्ही मुंबईकर मराठी स्त्रियाही नवरात्र म्हटलं की लगेच ए आपण दांडिया खेळूयात का म्हणतो. पण नवरात्र सुरू झालं की मला आठवतो तो माळीनगरच्या अंगणातला भोंडला. किती वर्षं नव्हे, उणीपुरी पन्नास वर्षं मागे जाते मी. पण आठवण किती ताजी टवटवीत आहे. पाऊस जवळजवळ संपत आलेला असे. हवा स्वच्छ. धुतल्यासारखी. हवेला एक सुंदरसा वास. पण कधीमधी पावसाची एखाददुसरी सर नक्की येऊन अंगण उगाच आपलं भिजवून जायची. मग ओल्या मातीचाही सुगंध दरवळू लागे. असलंनसलं ऊन सरून दिवस झुकू लागताना भोंडल्याची धांदल सुरू होई. दवाखाना बंद करून बाबा केव्हा येतात हे परतपरतजाऊन मी पहायची. कारण बाबा आले की पाटावर खडूनं मस्त हत्ती काढून देत. तो अंगणात मांडत. त्यावर मग आई रांगोळीनं गिरवून हळदकुंकू फुलं वाही. दवाखान्याच्या मोठ्या आवारात दूर एका बाजूला बुचाचे - गगनजाईचे- तीनचार उंच वृक्ष होते. पावसाळ्यात ते खूप बहरत. पायतळी पांढुरक्या फुलांचा नुसता खच पडे. लांब पिवळसर टुकटुकीत नळीसारखा देठ. त्यावर चार मोठ्या टोकदार पाकळ्यांचा चौफुला आणि पाचवी इवलुशी पाकळी दोन मोठ्या पाकळ्यांच्या मधून डोकावून पहाणारी. मधोमध केशरी पराग. आणि सगळ्यावर कडी म्हणजे वेडं करणारा घमघमणारा सुवास. (त्या नळीसारख्या देठातून गोड मधासारखं पाणी शोषता यायचं. पण त्या देठात बारीक मुंग्याही असत. मग देठ झटकून त्या पाडायच्या व देठ शोषायचा असंही आम्ही करीत असू.). ती बुचाची फुलं भरपूर गोळा करून देठांची गुंफून आम्ही मुलीमुली हार करून ठेवतच असू. हत्तीच्या पाटाभोवती घसघशीत हार घालायचा. बाबा सुध्दा कधीकधी पटापट हार करून देत. शिवाय गुलबाक्षीचेही हार असत. बाबांच्या सुंदर बागेतले टप्पोरे गुलाब, वेलींवरची जाईजुई ही आमच्या घरच्या भोंडल्याची खासियत असे. माझ्या बाबांना सगळंच करायला यायचं आणि करायला आवडायचंदेखील. मुली जमल्या की पाटाभोवती फेर धरून भोंडला सुरू व्हायचा. हस्त नक्षत्राच्या आगमनाचं स्वागत करणारी ती गोड, अर्थपूर्ण गाणी. माझी आई अंगणात येऊन खूप गोड आवाजात सुरेलपणे भोंडल्याची गाणी म्हणायची व आम्ही तिच्यामागून म्हणायचो. कधीकधी इतर मुलींच्या आयाही येत. भोंडला संपला की खरी धमाल असे ती म्हणजे खिरापत ओळखण्याची. कधीकधी अशी काही खिरापत असे की अर्धाअर्धा तासदेखील कुणी ओळखू शकायचं नाही. घरोघर असाच काहीतरी खास आडवाटेचा पदार्थ एकदातरी खिरापत म्हणून असेच. पण तो इथलाच व पौष्टिक असे. कमी खर्चात घरातल्याच गोष्टी वापरून बनवलेला. वडे समोसे ही नावंही ऐकण्यात नसलेला तो काळ. मग पिझा आणि नूडल्स तर दूरच. आमच्या आयांच्या पाककौशल्याला ते एक आव्हानच असे ना. काही हुशार मुली घरातून कसला वास येतोय यावर लक्ष ठेवून खिरापत ओळखत. मग त्यासाठी आया दुपारीच पदार्थ करून लपवून झाकून ठेवत. शेजारच्या ननीची आई अशी हटके खिरापत करण्यात तर अगदी कुशल होती.आणि ननीचे बाबा मधेच तिच्या आईला, ' आता सांगू का? ' असं म्हणत व हसत असत. खूपच गंमत यायची. खिरापत एकच असे असं नाही. दोनतीन पदार्थ, गोड, तिखट असंही असे. ओळखून झाली की ती सर्व मुलींना वाटायची. अशी दोनतीन घरी खिरापत खाऊनच पोटं टम्म होत असत. असा भोंडला रोज एकेकीच्या घरी व्हायचा. जिच्याकडे भोंडला असे ती त्यावेळी जणू राणी असल्याच्या थाटात वावरायची. मीपण नवा फ्राॅक किंवा परकर पोलका, बांगड्या व केसांत न पेलणारी फुलांची वेणी घालून तय्यार होई. पायात छुमछुम आणि लोंबणारे डूल तर मला अगदी मस्ट असायचे. सत्रावेळातरी मी आरशापुढे उभी राहून बघायची. आणि मग दादा नक्की काहीतरी खोडी काढून पळून जायचा. त्याला फक्त भोंडला होतो कधी व मी खिरापत खातो कधी एवढाच इंटरेस्ट असायचा ना.!एक सणच असे तो दिवस खास छोट्या मुलीचा. आता ते सगळं फक्त आठवणीत राहिलं. अजूनही नवरात्र आलं की माझ्या मनःचक्षुंपुढे ते चित्र जसंच्या तसं सरकू लागतं. तो ओल्या मातीचा, भिजलेल्या झाडांच्या खोडांचा आणि बुचाच्या फुलांचा एकत्रित सुगंध मनाच्या दरवाज्यातून आत येतो, दरवळू लागतो. ओलसर अंगणाचा पावलांना हवाहवासा स्पर्श होऊ लागतो. आईच्या आवाजातली भोंडल्याची गाणी ऐकू येऊ लागतात, खिरापत ओळखण्याचा गोंधळ कानी पडू लागतो. ते अंगण, ती आसपासची सृष्टी, ती हस्त नक्षत्रागमनाची ओलसर संध्याकाळ सगळंसगळं जणू कालपरवाचं दृष्य आहे असं वाटू लागतं आणि त्या तजेलदार आठवणीत मी रंगून जाते. माळीनगरमधले दिवस हे माझ्या आयुष्यातले अत्यंत सुंदर, निरागस व आनंदी दिवस होते. कदाचित त्या सकस व सशक्त शिदोरीनंच मला पुढल्या आयुष्यात खंबीरपणे उभं रहायचं बळ आणि येणा-या प्रत्येक दिवसाकडे पहाणारं उत्सुक मन व आशावाद दिले असावेत.
Monday, October 15, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment