Monday, October 15, 2018

मनाला सुखवणारी पुस्तकं.. आणि अशाच सुखविणारया काही कविता..
अलिकडेच मी प्रा. वीणा देवांचे एक छान पुस्तक वाचले. ‘परतोनि पाहे’ हे त्याचे नाव. ही केवळ व्यक्तिचित्रे नाहीत, तर त्याहून खूप काही जवळचे आहे. आणि वीणाताईंनी तर इतके सुंदर लिहीले आहे की जणू आपण आणि आपली एखादी मैत्रीण आपल्या जुन्या जिव्हाळ्याच्या सुखद आठवणी काढत निवांतपणे दुपारी मागल्या दारी  बसलो आहोत असेच वाटते वाचताना.  त्यातल्या अनेक व्यक्तिरेखा मी  माझ्या पुण्यातल्या दिवसांमध्ये म्हणजे माझ्या किशोरवयात आणि मी ऐन विशीत, याने की ‘दिवस तुझे हे फुलायचे’ अशा वयात असताना पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला ते पुस्तक वाचताना एक खूप सुंदर अनुभूती येत होती. मी मनाने त्या काळात जाऊन पोहोचले होते, ज्या काळात मी कधी ना कधी या व्यक्तींच्या कमी जास्त सहवासात आले होते. गो.नी. तथा आप्पासाहेब दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, अरुणा ढेरे, कवयित्रीद्वय  पद्मा गोळे आणि संजीवनी मराठे.. मला वीणाताईंचं हे पुस्तक खूपच आवडलंय आणि ते मी विकत घेऊन संग्रही ठेवणार आहे हे नक्की. कधीतरी आपण खूप कंटाळलेले असतो, काहीच गोड लागत नसते तेव्हा असं एखादं पुस्तक, अशी एखादी कथा अचानक आठवावी आणि ते पुस्तक, ती कविता हाताशीच मिळावी, असं झालं तर ऐन उन्हाळ्यात वारयाची हलकी झुळूक यावी तसं होऊन जातं. अशी काही पुस्तकं असतात जी मनात घर करून बसतात. काही वर्षांपूर्वी मी ‘त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात’ नावाचं मंदाकिनी गोगटेंचं पुस्तक वाचलं. ते मनातून जाता जात नाही. युरोपच्या भटकंतीत त्यांनी जो काही फुलोत्सव अनुभवला त्यचं अतिशय हृदयंगम वर्णन या पुस्तकात आहे. नकळत कधी आपण मनाने त्यांच्याबरोबर युरोपात पोहोचतो कळत नाही, आणि पुस्तक वाचून संपवल्यावरही त्याची गुंगी दिवसचे दिवस मनावरुन उतरत नाही. हे पुस्तकही मला खरेदी करायचे आहे. मी शाळा-कॉलेजच्या वयात अशीच दुर्गा भागवतांच्या ऋतुचक्राने भारावून गेले होते. रवींद्रनाथांची गीतांजली वाचल्यानंतर मंत्रमुग्ध झाले होते. अनेक दिवस ते हरवलेपणच जगत होते. आजही गीतांजली मधील एखादी ओळ जरी वाचली तरी मी पुन्हा त्याच ट्रांसमध्ये जाते. वर्ड्स्वर्थची डॅफोडिल्स मला अजूनही तशीच भुलवतात. डोलवतात. कवी अनिलांची (चूकभूल द्यावी घ्यावी) ‘अशा एखाद्या तळ्याकाठी बसून रहावे मला वाटते जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते ’.. ही कविता तर हरघडी आठवत असते आणि ती हलकेच म्हणून पहायलाही आवडते मला. मनातली व्याकुळ इच्छाच बाहेर पडते तेव्हा. कवी बा.सी. मर्ढेकरांच्या ‘दवात आलिस भल्या पहाटे, अभ्रांच्या शोभेत एकदा, पुढे जराशी हसलिस, मागे.. मागे वळून पहाणे विसरलिस का?’ या कवितेची गुणगुण अशीच मनाला सुखवत रहाते. तसंच हळुवार फीलिंग येतं ते खूप जुन्या, पण चिरतरुण अशा काही गाण्यांनी. जसे ‘रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते.. अशा किती म्हणून गोष्टी असतात. मी जेव्हा स्व. वासंती मुझुमदारांचं ‘नदीकाठी’ वाचलं तेव्हा अशीच त्यात गुंतून पडले होते कितीतरी दिवस. ती सुप्रसिध्द कविता ‘कावळ्यांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरं कशी गोंगाट करती’ नव्याच संदर्भानं त्या पुस्तकातून पुर्नभेटीला आली आणि मन बालपणीच्या आठवणींनी व्याकुळ व्याकुळ होऊन गेलं.

No comments:

Post a Comment