Thursday, April 23, 2020

डहुलतेय जग आज सारे



डहुलतेय जग आज सारे आक्रंद मूक व्यापी
हतबल नतमस्तक झाले मदमस्त अहंकारी.
ही दुनिया अखंडभोगी कोंडली अभागी सारी
तू कर्ता असशी आणिक करविता तूच जरी.
मनातल्या गाभार्यात मी तुझी वीट मांडलेली
ती कधीच नाही हलली जरी हलले अंतर्यामी.
आत आज जाणवते ते, जे आर्त नेणिवेत होते
जे दिसले नाही कुणा की उमजले कुणा नव्हते.
असुनी ओंजल भरलेली का रड्वेले जगणे
अंतरात घुसमट्ले होते आनन्दाचे गाणे.
हरेक इथे वखवखलेला शापीत होत आहे
नेणीव बोलते आहे, कितीतरी उमगते आहे.
शापातुन मुक्तीसाठी जग व्याकुल होते आहे
मीपण ज्याचे त्याचे तटतटा तुटते आहे.
मनातल्या गाभार्यातिल ती वीट तुझी मांडलेली
ती कधीच नाही हलली जरी हलले अंतर्यामी.
स्वाती 23.4.2020

आम्ही कुणीच नाही राहिलो



आम्ही कुणीच नाही राहिलो भोगांच्या शर्यतीत मागे..
पंचेंद्रियांना दुखवत दुखावत धावत राहिलो सुखे संपूच नयेत म्हणून
नाही पाहिले आम्ही कधीच तुझे अश्रू ओघलताना
तुझेच रक्त सांडताना, तुझाच घाम निथलताना
पाहिला तरी तो आम्ही आमचा हक्क समजलों
आम्ही कुणीच नाही राहिलो भोगांच्या शर्यतीत मागे...
तुझाच केवल अधिकार असताना या चंचल अशाश्वत जगतावर
तुला वाजत गाजत मखरात बसवून आम्ही आमचाच अभिषेक करून घेतला
आम्ही अनंतफंदी, अचाटछंदी स्वत:ची भुसभुशीत वारुले उभी करत गेलो
आम्ही कुणीच नाही राहिलो भोगांच्या शर्यतीत मागे..
तुझा अंकुश तुझ्याच हाती होता पण आम्ही शहाण्यानी कधी जो मानलाच नाही
तू सोसत होतास शांत अविचलपने आमच्या टाल्या, आरत्या आणि मखलाशा
तुला फसवू पहाताना आमचे आम्हीच विपर्यस्त होत गेलो
आम्ही कुणीच नाही राहिलो भोगांच्या शर्यतीत मागे..
आम्ही कुणीच नाही झालो जे तुला घडवायचे होते..

स्वाती 23.4.2020

Thursday, April 25, 2019

भेट नागझि-याशी

खूप दिवस मनाला कुणीसं भुलवत होतं, बोलावत होतं, खुणावत होतं, आणि एक दिवस मी जंगलात गेले तेव्हा कळलं की ते बोलावणारं दुसरं तिसरं कोणी नसून जितंजागतं जंगल होतं. स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की ख-याखु-या जंगलात जाता येतं, चार दिवस जंगलमय होऊन रहाता येतं, मीही राहीन, जंगल पाहीन, जंगल फिरीन, जंगल वाचीन, जंगलाचे रंग, रूप, रस,गंध, स्पर्श शोषून घेऊ पाहीन माझ्यात; त्याच्या माती आणि पाण्यासह, प्रकाश आणि आकाशासह, झाडं, वेली, दगड, धोंडे, पशु आणि पक्षी आणि सा-यासह जंगल जगू पाहीन मी असं कधी वाटलं नव्हतं.. बालपणी सगळ्या कथाकवितांमधून मनात ठसला होता एक बागुलबुवा 'जंगल' नावाचा, म्हणून मी डोळे विस्फारून, कान टवकारून, श्वास रोखून जंगल अजमावत गेले, जंगलाला ध्यानी मनी स्वप्नी गोंदून घेत गेले आणि कळलं, बागुलबुवा तर नाहीच तो पण, 'जंगल धरतीचा एक स्वयंजात श्वास आहे, जंगल एक काव्य आहे, जंगल एक बोलावणं आहे- निखळ जगण्याचं आमंत्रण; जंगल हे एक सत्चिदानंदी  जगणं आहे'.

Wednesday, October 17, 2018

कधीकधी मन रिकामं रिकामं होऊन रहातं
तर कधी नको इतकं भरभरून येतं..
कधी धबधब्यासारख्या कोसळत्या आठवणी
तर कधी झ-यासारखी सुरेल खळखळणारी गाणी
कधी मनात उमटत जातात अनघड आडवळणी वाटा
कधी उदास झाकोळलेल्या सावल्या फेर धरतात
कधी कोंदून गेलेल्या आभाळासारखं खिन्न मन
तर कधी उन्हाळलेल्या
लख्ख सोनेरी आशांनी झळाळलेलं मन...
पंख लावून प-यांचे स्वप्नात भरकटणारं चुकार पोर मन
हातात सोनेरी सुख धरून मावळलेल्या ता-यांचा शोध घेत
डोळे पुसणारं कापरं मन..
पाठीवर फिरलेल्या मायेच्या हातांची सय येताना हसून साजरं करणारं अबोल मन ..
कसंही झालं तरी मन आपलंच असतं, फक्त आपलं
कधीकधी ते रिकामंरिकामं होऊन रहातं
तर कधी नको इतकं भरभरून वहातं..
-स्वाती.
    कोकणचा गोडवा
जेव्हाजेव्हा मी कोकणात जाते तेव्हा दरवेळी मी कोकणच्या नव्यानं प्रेमात पडते.. इथली सृष्टी केवळ वर्णनापलिकडली आहे. आपल्याशी शब्देविण संवादु करणारी.. ती गर्द झाडी, त्यातून कधी उंच उडी मारत तर कधी झपकन खाली जात  लपंडाव खेळत जाणारे ते वळणावळणांचे लाल मातीचे रस्ते, त्या पाउलवाटा, तो अथांग निळाभोर दरिया, ते शुभ्र फेसानं नटणारे किनारे, त्या खळाळत्या निर्भर लाटा.. एवढंच नाही तर लाल लाल वळणवाटांनी जाताजाता मधेच लागणारी छोटीछोटी गावं, त्यातली ती आत्ममग्न घरं आणि ती आत्ममग्न अशीच माणसं.. हिरवीगार भातशेती. कुठंकुठं दूरात वसलेली अज्ञात कालाचा वारसा सांगणारी देवळं आणि त्यातले ते गूढ गंभीर देवदेवी.. छोट्याशा दक्षिणेवरही संतुष्ट पावणारे त्यांचे पुजारी.. कुणी कुळाचाराला पाया पडायला दूरवरून माणसं आली, देवाची आठवण ठेवून आली यातच त्यांचं मन भरून. पावलेलं त्यांच्या चेह-यावर दिसतं.. श्रध्देचा बाजार नाही, ओढून घेणारी हाव नाही,  फाफटपसारे बडेजाव नाही. शांत देवळं, हळद कुंकू फुलांचे सुगंध आणि प्रेमाची, मायेची ऊब असलेली ती देवळं. तशी ती किती तरी दूरवर धीमेधीमे चालत जाणारी साधी माणसं..खरंच सृष्टीचं एक अनाघ्रात स्वर्गीय देखणेपण हळुवारपणे अनुभवावं तर माझ्या कोकणात..

Monday, October 15, 2018

मनाला सुखवणारी पुस्तकं.. आणि अशाच सुखविणारया काही कविता..
अलिकडेच मी प्रा. वीणा देवांचे एक छान पुस्तक वाचले. ‘परतोनि पाहे’ हे त्याचे नाव. ही केवळ व्यक्तिचित्रे नाहीत, तर त्याहून खूप काही जवळचे आहे. आणि वीणाताईंनी तर इतके सुंदर लिहीले आहे की जणू आपण आणि आपली एखादी मैत्रीण आपल्या जुन्या जिव्हाळ्याच्या सुखद आठवणी काढत निवांतपणे दुपारी मागल्या दारी  बसलो आहोत असेच वाटते वाचताना.  त्यातल्या अनेक व्यक्तिरेखा मी  माझ्या पुण्यातल्या दिवसांमध्ये म्हणजे माझ्या किशोरवयात आणि मी ऐन विशीत, याने की ‘दिवस तुझे हे फुलायचे’ अशा वयात असताना पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला ते पुस्तक वाचताना एक खूप सुंदर अनुभूती येत होती. मी मनाने त्या काळात जाऊन पोहोचले होते, ज्या काळात मी कधी ना कधी या व्यक्तींच्या कमी जास्त सहवासात आले होते. गो.नी. तथा आप्पासाहेब दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, अरुणा ढेरे, कवयित्रीद्वय  पद्मा गोळे आणि संजीवनी मराठे.. मला वीणाताईंचं हे पुस्तक खूपच आवडलंय आणि ते मी विकत घेऊन संग्रही ठेवणार आहे हे नक्की. कधीतरी आपण खूप कंटाळलेले असतो, काहीच गोड लागत नसते तेव्हा असं एखादं पुस्तक, अशी एखादी कथा अचानक आठवावी आणि ते पुस्तक, ती कविता हाताशीच मिळावी, असं झालं तर ऐन उन्हाळ्यात वारयाची हलकी झुळूक यावी तसं होऊन जातं. अशी काही पुस्तकं असतात जी मनात घर करून बसतात. काही वर्षांपूर्वी मी ‘त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात’ नावाचं मंदाकिनी गोगटेंचं पुस्तक वाचलं. ते मनातून जाता जात नाही. युरोपच्या भटकंतीत त्यांनी जो काही फुलोत्सव अनुभवला त्यचं अतिशय हृदयंगम वर्णन या पुस्तकात आहे. नकळत कधी आपण मनाने त्यांच्याबरोबर युरोपात पोहोचतो कळत नाही, आणि पुस्तक वाचून संपवल्यावरही त्याची गुंगी दिवसचे दिवस मनावरुन उतरत नाही. हे पुस्तकही मला खरेदी करायचे आहे. मी शाळा-कॉलेजच्या वयात अशीच दुर्गा भागवतांच्या ऋतुचक्राने भारावून गेले होते. रवींद्रनाथांची गीतांजली वाचल्यानंतर मंत्रमुग्ध झाले होते. अनेक दिवस ते हरवलेपणच जगत होते. आजही गीतांजली मधील एखादी ओळ जरी वाचली तरी मी पुन्हा त्याच ट्रांसमध्ये जाते. वर्ड्स्वर्थची डॅफोडिल्स मला अजूनही तशीच भुलवतात. डोलवतात. कवी अनिलांची (चूकभूल द्यावी घ्यावी) ‘अशा एखाद्या तळ्याकाठी बसून रहावे मला वाटते जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते ’.. ही कविता तर हरघडी आठवत असते आणि ती हलकेच म्हणून पहायलाही आवडते मला. मनातली व्याकुळ इच्छाच बाहेर पडते तेव्हा. कवी बा.सी. मर्ढेकरांच्या ‘दवात आलिस भल्या पहाटे, अभ्रांच्या शोभेत एकदा, पुढे जराशी हसलिस, मागे.. मागे वळून पहाणे विसरलिस का?’ या कवितेची गुणगुण अशीच मनाला सुखवत रहाते. तसंच हळुवार फीलिंग येतं ते खूप जुन्या, पण चिरतरुण अशा काही गाण्यांनी. जसे ‘रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते.. अशा किती म्हणून गोष्टी असतात. मी जेव्हा स्व. वासंती मुझुमदारांचं ‘नदीकाठी’ वाचलं तेव्हा अशीच त्यात गुंतून पडले होते कितीतरी दिवस. ती सुप्रसिध्द कविता ‘कावळ्यांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरं कशी गोंगाट करती’ नव्याच संदर्भानं त्या पुस्तकातून पुर्नभेटीला आली आणि मन बालपणीच्या आठवणींनी व्याकुळ व्याकुळ होऊन गेलं.

नवरात्रीचे दिवस आहेत. शेजारच्या सोसायटीत देवीची स्थापना करतात. मगाशी दांडियाचे आवाज ऐकू येत होते. आता ठिकठिकाणी दांडिया असतो. झगमग पोशाख, मेकप, खाद्यपेयांचे स्टाॅल्स, बक्षीसं आणि कायकाय! आजकाल आम्ही मुंबईकर मराठी स्त्रियाही नवरात्र म्हटलं की लगेच ए आपण दांडिया खेळूयात का म्हणतो. पण नवरात्र सुरू झालं की मला आठवतो तो माळीनगरच्या अंगणातला भोंडला. किती वर्षं नव्हे, उणीपुरी पन्नास वर्षं मागे जाते मी. पण आठवण किती ताजी टवटवीत आहे. पाऊस जवळजवळ संपत आलेला असे. हवा स्वच्छ.  धुतल्यासारखी. हवेला एक सुंदरसा वास. पण कधीमधी पावसाची एखाददुसरी सर नक्की येऊन अंगण उगाच आपलं भिजवून जायची. मग ओल्या मातीचाही सुगंध दरवळू लागे. असलंनसलं ऊन सरून दिवस झुकू लागताना भोंडल्याची धांदल सुरू होई. दवाखाना बंद करून बाबा केव्हा येतात हे परतपरतजाऊन मी पहायची. कारण बाबा आले की  पाटावर खडूनं  मस्त  हत्ती काढून देत. तो अंगणात मांडत. त्यावर मग आई रांगोळीनं गिरवून हळदकुंकू फुलं वाही. दवाखान्याच्या मोठ्या आवारात दूर एका बाजूला बुचाचे - गगनजाईचे- तीनचार उंच वृक्ष होते. पावसाळ्यात ते खूप बहरत. पायतळी पांढुरक्या फुलांचा नुसता खच पडे. लांब पिवळसर टुकटुकीत नळीसारखा देठ. त्यावर चार मोठ्या  टोकदार पाकळ्यांचा चौफुला आणि पाचवी इवलुशी पाकळी दोन मोठ्या पाकळ्यांच्या मधून डोकावून पहाणारी. मधोमध केशरी पराग. आणि सगळ्यावर कडी म्हणजे वेडं करणारा घमघमणारा सुवास. (त्या नळीसारख्या देठातून गोड मधासारखं पाणी शोषता यायचं. पण त्या देठात बारीक मुंग्याही असत. मग देठ झटकून त्या पाडायच्या व देठ शोषायचा असंही आम्ही करीत असू.).  ती बुचाची फुलं भरपूर गोळा करून देठांची गुंफून आम्ही मुलीमुली हार करून ठेवतच असू. हत्तीच्या पाटाभोवती घसघशीत हार घालायचा. बाबा सुध्दा कधीकधी पटापट हार करून देत. शिवाय गुलबाक्षीचेही हार असत. बाबांच्या सुंदर बागेतले टप्पोरे गुलाब,  वेलींवरची जाईजुई ही आमच्या घरच्या भोंडल्याची खासियत असे. माझ्या बाबांना सगळंच करायला यायचं आणि करायला आवडायचंदेखील. मुली जमल्या की पाटाभोवती फेर धरून भोंडला सुरू व्हायचा. हस्त नक्षत्राच्या आगमनाचं स्वागत करणारी ती गोड, अर्थपूर्ण गाणी. माझी आई अंगणात येऊन खूप गोड आवाजात सुरेलपणे भोंडल्याची गाणी म्हणायची व आम्ही तिच्यामागून म्हणायचो. कधीकधी इतर मुलींच्या आयाही येत. भोंडला संपला की खरी धमाल असे ती म्हणजे खिरापत ओळखण्याची. कधीकधी अशी काही खिरापत असे की अर्धाअर्धा तासदेखील कुणी ओळखू शकायचं नाही. घरोघर असाच काहीतरी खास आडवाटेचा पदार्थ एकदातरी खिरापत म्हणून असेच.  पण  तो इथलाच व पौष्टिक असे. कमी खर्चात घरातल्याच गोष्टी वापरून बनवलेला. वडे समोसे ही नावंही ऐकण्यात नसलेला तो काळ. मग पिझा आणि नूडल्स तर दूरच. आमच्या आयांच्या पाककौशल्याला ते एक आव्हानच असे ना. काही हुशार मुली घरातून कसला वास येतोय यावर लक्ष ठेवून खिरापत ओळखत. मग त्यासाठी आया दुपारीच पदार्थ करून लपवून झाकून ठेवत. शेजारच्या ननीची आई अशी हटके खिरापत करण्यात तर अगदी कुशल होती.आणि ननीचे बाबा मधेच तिच्या आईला, ' आता सांगू का? ' असं म्हणत व हसत असत. खूपच गंमत यायची. खिरापत एकच असे असं नाही. दोनतीन पदार्थ, गोड, तिखट असंही असे. ओळखून झाली की ती सर्व मुलींना वाटायची. अशी दोनतीन घरी खिरापत खाऊनच पोटं टम्म होत असत.  असा भोंडला रोज एकेकीच्या घरी व्हायचा. जिच्याकडे भोंडला असे ती त्यावेळी जणू राणी असल्याच्या थाटात वावरायची. मीपण नवा फ्राॅक किंवा परकर पोलका, बांगड्या व केसांत न पेलणारी फुलांची वेणी घालून तय्यार होई. पायात छुमछुम आणि लोंबणारे डूल तर मला अगदी मस्ट असायचे. सत्रावेळातरी मी आरशापुढे उभी राहून बघायची. आणि मग दादा नक्की काहीतरी खोडी काढून पळून जायचा. त्याला फक्त भोंडला होतो कधी व मी खिरापत खातो कधी एवढाच इंटरेस्ट असायचा ना.!एक सणच असे तो दिवस खास छोट्या मुलीचा. आता ते सगळं फक्त आठवणीत राहिलं. अजूनही नवरात्र आलं की माझ्या मनःचक्षुंपुढे ते चित्र जसंच्या तसं सरकू लागतं. तो ओल्या मातीचा, भिजलेल्या झाडांच्या खोडांचा आणि बुचाच्या फुलांचा एकत्रित सुगंध मनाच्या दरवाज्यातून आत येतो, दरवळू लागतो. ओलसर अंगणाचा  पावलांना हवाहवासा स्पर्श होऊ लागतो. आईच्या आवाजातली भोंडल्याची गाणी ऐकू येऊ लागतात, खिरापत ओळखण्याचा गोंधळ कानी पडू लागतो. ते अंगण, ती आसपासची सृष्टी, ती हस्त नक्षत्रागमनाची ओलसर संध्याकाळ सगळंसगळं जणू कालपरवाचं दृष्य आहे असं वाटू लागतं आणि त्या तजेलदार आठवणीत मी रंगून जाते. माळीनगरमधले दिवस हे माझ्या आयुष्यातले अत्यंत सुंदर, निरागस व आनंदी दिवस होते. कदाचित त्या सकस व सशक्त शिदोरीनंच मला पुढल्या आयुष्यात खंबीरपणे उभं रहायचं बळ आणि येणा-या प्रत्येक दिवसाकडे पहाणारं उत्सुक मन व आशावाद दिले असावेत.